॥ℜudra॥

इतर लाखो- करोडो लोकांसारखं तुमचं जीवन साधेपणाने चाललेलं आहे. रोजची कटकट, दगदग, धावपळ तुमच्याही वाट्याला आलेली आहे. पण तरीही तुम्ही त्यात समाधानी आहात. कारण तुमच्याजवळ तुमचं घर आहे, पोटापाण्यासाठी नोकरी आहे, बर्‍यापैकी पगार आहे, आजूबाजूला- मित्र-मैत्रिणी आहेत, बरेच कलिग्स आहेत, अनगिनत जळू आहेत!
आणि हो!
या सगळ्यांत मिठाचा खडा टाकायला, प्रत्येकाच्या राशीला असतो तसा एक खडूस बॉसही आहे. सगळं कसं व्यवस्थित चालू आहे. आणि एक दिवस तुम्हाला कळतं..

तुम्हाला तुमच्याच घरात जीवंत मारलं जाणार आहे!
आणि इथेच सुरु होतो एक जीवघेणा संघर्ष.. स्वत:ला जिवंत ठेवण्याचा!

जीवाच्या भीतीने तुम्हाला – तुमचं घरदार, पैसाअडका, कपडालत्ता, दागिने सगळं सोडून एका रात्रीत पोबारा करावा लागतो. तुम्ही निराधार होता. हतबल होता. एखाद्या अनिश्चित दिशेने  तुमच्या जीवनाची वाटचाल चालू होते. जगणार की मरणार हा एकच प्रश्न, प्रत्येक क्षणाला, सैतानासारखा तुमच्यासमोर आ वासून उभा ठाकतो. उर फुटेपर्यंत तुम्ही नुसतेच पळत राहता. अन एका नाजूक वळणावर, तुमच्याच जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला दगा दिला जातो!

असुरक्षितता काय ते त्यावेळी समजायला लागते, ज्यावेळी तुमच्या संपर्कात असलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या संशयाच्या घेर्‍यात फिरत राहते आणि तुम्ही त्यांच्या मेन निशाण्यावर!
तेव्हा कुठे जाणीव व्हायला लागते…
आपलं जीवन सर्वसामान्य कधीच नव्हतं. ते तसं मानण्यात आपणच घोडचूक केली होती. मग प्रश्न उरतो का?

या ‘का’ तच सगळ्याचं रहस्य दडलेलं असतं!

“असंभव” (एक चित्तथरारक प्रेमकथा) ::=>> भाग- 15

असंभव भाग:=>>14 पासून पुढे…

*एका नव्या मित्राची भेट*

शनिवारची रात्र त्यांच्यासाठी जरा जास्तच धावपळीत गेली. पण नंतर मात्र एखादं झंझावाती निघून गेल्यावर वातावरण शांत-प्रसन्न व्हावं तसं झालं होतं. खासकरून निलांबरी बद्दल. ती पूर्वीसारखी हसा-बोलायला लागली होती. त्या भामट्यांना अद्दल घडवल्यानंतर तिने स्वत:हून क्षितिज-अमरला ब्लू क्वीनला पार्टी दिली होती. तिही चक्क ओली!

त्या दोघी आता त्यांच्या केवळ ओळखीच्या राहिल्या नव्हत्या, तर जवळच्या घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या. दुसर्‍याच भेटीत ‘अरे-तुरे’ बोलण्या इतके त्यांच्यात आपुलकीचे बंध जुळले गेले होते.

रविवारी सकाळी सर्व ओके असल्याचा आणि काम फत्ते झाल्याचा क्षितिजचा फोन आला आणि अक्षरश: जीव भांड्यात पडल्यासारखा वाटला तिला. मनावरचं मणामणाचं ओझं कमी झालं. खुप मोठ्या संकटातून सुटल्यासारखं तिला एकदम हलकं वाटू लागलं. त्याबद्दल तिने क्षितिजचे मनापासून आभार मानले. अमरचे कौतुक केले. योग्य वेळी मदत केल्याबद्दल तिने दोघांची कृतज्ञता व्यक्त केली. जवळ-जवळ अर्धा-पाऊण तास त्यांचं हे बोलणं चालू होतं. कॉन्फरन्सवर रियापण होती. मग सगळं नीट झाल्यावर निलांबरीने सगळ्यांसाठी रात्रीची डिनरची संकल्पना मांडली. हो नाही बोलत सगळ्यांनी त्याला मंजूरी दिली. क्षितिज सतत बिझी असल्याने तिने आवर्जून यावेळी त्याला आपली सगळी कामं बाजूला ठेवून त्यांच्यासाठी वेळ काढायला सांगितला. त्यानुसार संध्याकाळी बरोबर सव्वा सातला सगळेजण रिगलला भेटणार होते. तिथून सिनेमा बघून सी फेसला येणार होते. भरपेट जेवण करणार होते. मनसोक्त गप्पा झोडणार होते आणि मग आरामात घरी परतणार होते.

सगळं कसं नियोजनबद्ध होतं. पण नंतर दुपारी रियाने फोन करुन मध्येच काहीतरी शॉपिंगचं फॅड काढलं आणि पाच ऐवजी तीनलाच दोघी घराबाहेर पडल्या. जाताना त्यांनी क्षितिज आणि अमरलाही सोबत बोलावून घेतलं. म्हणजे तेवढीच त्यांची कंपनी आणि शिवाय सिनेमाला जातानाही सगळे संगतीने जाणार होते. त्यात मुलींचा खरेदीतला ‘आटोपशीरपणा’ लक्षात घेऊन अमरने रिगल जवळ बाईक पार्क करुन ठेवली. मग शॉप, मॉल्स, शो रुम, ज्वेलरी स्टोअर्स ते अगदी- पार टोकाच्या फॅशन स्ट्रीट रोडपर्यंत त्यांची अविश्रांत बडबड आणि भटकंती चालू झाली.

यावेळी बोलत असताना मध्येच एखाद्याला कोपरखळी मार, वेडावून दाखव, कधी चिमटाच काढ, एखाद्याला एखाद्या विषयावरुन फजितीच कर, तर कधी मुद्दाम फरफटत चालत धप्पकन पाण्यात उडी मारुन खोडी काढ- असे त्यांचे बालिश प्रकार चालू होते. क्षितिज आणि अमरही त्यांच्या या पोरकटपणात मनापासून सामिल झाले होते.

शेवटी एकदाची मनसोक्त आणि दोघींच्या मते बेताचीच शॉपिंग करुन झाल्यावर सगळे फडके चौकाच्या दिशेने यायला निघाले. वाटेत निलांबरीने क्षितिजला एक लेदरचं ऑल सिझन ब्राउन जॅकेट घेऊन दिलं.‘घेच! नाहीतर बोलणार नाही’ वगैरे रुसवे फुगवे करत तिने ते हट्टाने त्याला घालायला भाग पाडलं.

शॉपिंगच्या बॅगा संभाळत आणि ट्रॅफिक- गर्दीतून वाट काढत सिनेमा लेनला यायला त्यांना साडे आठ वाजले होते. तिथून पुढे मेट्रो आयनॉक्सला पोहोचे पर्यंत सव्वा आठ! तोपर्यंत इकडे सगळी पांगापांग झाली होती. बुकींग विंडो बंद झाली होती. आत शो सुरु झाला होता आणि बाहेर विंडोवर ‘क्लोजड्’ ची पाटी त्यांच्याकडे बघून वाकुल्या दाखवत हसत होती!

“आता?”
रियाने हताशपणे निलांबरीकडे बघितलं.

“तरी मी बोलत होते, दुपारी दोनला शॉपिंगला निघूया. लवकर आटपलं असतं!” आदळापट करत निलांबरीने आपला स्त्री युक्तीवाद मांडला.

क्षितिज आणि अमर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नाहीसं दाखवत नुसतेच गालातल्या गालात खुदकत राहिले.

सिनेमाचं गणित फिस्कटल्याने तो प्लॅन कॅन्सल करुन चौघे चौपाटीला आले. सलग चार तास चालल्याने सगळेच खूप दमले होते. एका ठिकाणची मोकळी जागा बघून सगळेजण त्यावर विसावले. त्यातल्या त्यात एक बरं होतं. आज दुपार पासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे त्यांना नीट फिरता तरी आलं होतं. आत्ताही ते ज्या कट्ट्यावर बसले होते, तो पूर्णपणे कोरडा होता. समुद्राकडून थंड हवेच्या लाटा तेवढ्या शरीरावर शिरशिरी आणत आदळत होत्या. त्या शांत प्रसन्न मुडमध्ये चौघे मंत्रमुग्ध होऊन गेले.

“सॉरी यार, पिक्चरचा प्लॅन तेवढा फ्लॉप गेला” निलांबरी ऑफ होत आपली खंत व्यक्त करत बोलली.

“जाऊ दे तुमचं काम झालं ना?” निलांबरीने डोळे मोठे केले. रियाचा आ वासला गेला.

“ये हा बघ!” हसत रिया उद्गरली, “म्हणजे आम्हीच उशीर केला ना?”

“अगं.. मला तसं म्हणायचं नव्हतं…” सावरत अमर हसत बोलला. तसे सगळे त्याच्यावर हसायला लागले.

काही वेळ तिथंच चौपाटीवर मोकळ्या हवेत गप्पा मारत वेळ घालवल्यावर चौघे टॅक्सी करुन सी फेसकडे यायला निघाले. त्यावेळी त्यांच्यात- ‘मुंबईत कुठलं ठिकाण फिरण्या योग्य आहे’ याबाबत चर्चा रंगली होती. अर्थात क्षितिज आणि अमरला बार शिवाय दुसरं ठिकाण नजरेसमोर येत नसल्याने ते फक्त श्रवण भक्ती करत राहिले. त्यानंतर निलांबरीने आपले कॉलेजचे एक-सो एक अतरंगी किस्से सांगायला सुरवात केली. रियाही तिच्यात भर घालत तिला एखादा किस्सा आठवून देत होती. सी फेसचं टोकं येईपर्यंत त्यांचा हा गोंधळ चालू होता. पण एकदाचा सी फेस एन्ड आला आणि त्यांच्यातल्या गप्पा आपोआप विरुन गेल्या. टॅक्सीचा वेग कमी होताच क्षितिजने किंचीत खाली वाकून खिडकीतून बाहेर नजर टाकली. समोरच डावीकडे ब्लू क्वीनची भली मोठी काचेरी- ठोकळा बिल्डींग दिसायला लागली होती..

ब्लू क्वीन.
ज्यानं कोणी हे नाव दिलं होतं ते अगदी साजेसंच दिलं होतं. हॉटेलच्या एन्ट्रन्सलाच निळ्याशार, गोलाकार पाण्यात- कारंज्यांमध्ये एक धुंद नजरेची आणि नुकतीच कोवळ्या वयातून तारुण्यात पदार्पण करत असलेली, मादक- नीळी जलपरी स्वागताला बसलेली होती. शिल्पकाराने असं काही अफलातून डोकं लावून तिला बनवलं होतं की इथे येणारा जो-तो तहान-भूक विसरुन फक्त तिच्याकडेच वेडावून पाहत होता. पाण्याच्या मधोमध, आयलंडवर असतो तसा एक पांढरट-रंगीत खडक. त्यावर अर्धवट बसलेली, अर्धवट पाण्यातून बाहेर आलेली कोवळी सागर कन्या!

ज्या अदाकारीने ती खडकावर सलज्ज मुद्रेनं बसली होती ते बघूनच समोरचा हजार वेळा घायाळ होऊन जात होता. त्यातून तिच्या आरसपाणी शरीरावर चहूबाजूंनी उडणार्‍या संथ पाण्याच्या तुषारांनी आणि चेहर्‍यावर फेकलेल्या एक विशिष्ठ प्रकारच्या- रंगसंगतीच्या प्रकाशांनी तिला आणखीन जीवंत अन आकर्षक केले होते. असे वाटत होते की- जणू ही आत्ताच स्वमग्न अवस्थेतून जागी होईल अन आपल्याकडे बघून बावरून पाण्यामध्ये विरघळून जाईल!

क्षितिज अन अमर थक्क होऊन हॉटेलचा परिसर बघत होते. आजपर्यंत त्यांनी जितके पण फाईव्ह स्टार हॉटेल्स बघितले होते त्यापैकी हे नक्कीच सरस होते. नुसता मोठेपणाचा आव आणून पैसे उकळण्याचा प्रकार इथे अजिबात नव्हता. हॉटेलचा प्रत्येक विभाग इथे स्वतंत्र ठेवण्यात आला होता. आणि प्रत्येकाची प्रायव्हसी आबाधित राहील याची विशेष दक्षता घेतली गेली होती. पब, ड्रिंक्स, स्मोकिंग झोन, शिवाय सगळ्यात वर फॅमिली रेस्टॉरंट आणि कपल्स, यंगस्टर्ससाठी खुल्या बाल्कनीची सोय! सगळं कसं अ‍ॅक्युरेट जागच्या जाग्यावर होतं. जणू इथे येणार्‍या प्रत्येक कस्टमर्सची नस ओळखूनच याची संरचना करण्यात आली होती.

समुद्राच्या काठालगतच्या काळ्याकभिन्न पार्श्वभूमीवर ब्लू क्वीनची इमारत जशी उठून दिसत होती, तशीच ती आतूनही आकर्षक दिसत होती. ठिकठिकाणी लावलेली छोटी-छोटी झुंबरं एखाद्या पांढर्‍या शुभ्र मोत्यांच्या घसांसारखी वाटत होती. त्याने हॉटेलचा कोपरा न कोपरा उजळून निघाला होता. प्रत्येक खिडकीच्या बाजूंनी छोटे-छोटे मखमली कर्टन्स सोडलेले होते. मेन एन्ट्रन्सला तर पूर्ण प्रवेशद्वार झाकलं जाईल एवढा मोठा- विशालकाय रेड कर्टन, दोन्ही बाजूंनी जाड पिळाच्या रोपने खेचून बांधून ठेवण्यात आला होता. प्रत्येक ठिकाणच्या पोल, बिम अन भिंती न छताच्या मधल्या जागेत लावलेल्या लखाखत्या मिरर्सच्या तुकड्यांनी ब्लू क्वीनला शीश महालचा आभास निर्माण केला होता.

चौघे लिफ्टनं तिसर्‍या माळ्यावर आले. प्रत्येकाला बसण्यासाठी लंब गोलाकार, पण ऐसपैस टेबलाची सोय करण्यात आली होती. टेबलावर अंथरलेल्या मुलायम- यलो, पिंक, स्काय ब्लू, शेड्सच्या ब्राईट व्हाईट क्लोथवरनं हॉटेलच्या दर्जाची कल्पना येत होती.
टेबलाभोवती बसल्यानंतर निलांबरीने सगळ्यांसाठी पहिल्यांदा नॉनवेजची ऑर्डर केली. स्वत: ड्रिंक्स घेत नसली तरी तिने क्षितिज, अमर आणि रियाला बिनधास्तपणे त्यांच्या आवडत्या ड्रिंक्सची ऑर्डर करायला सांगितली.

हसत खेळत पुन्हा ते गप्पांत रमून गेले. आज सगळे आनंदी मुडमध्ये होते. विशेषत: निलांबरीचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. खूप दिवसांनी कोणीतरी जिवाभावाचं भेटल्यासारखं ती खुलून गेली होती. काय बोलू नी काय नको असं तिला झालं होतं. दुसर्‍या भेटीत असे चटकन त्यांच्यातलेच होऊन गेलेले क्षितिज, अमर हे त्यांचे पहिलेच मित्र होते. क्षितिज आणि अमरलाही या दोघी परक्या वाटत नव्हत्या. जणू काही खूप आधीपासून ते त्यांना ओळखत होते.

जेवण येईपर्यंत निलांबरी आणि रियाने आपल्याबद्दलचे काही थ्रिलिंग अन गमतीशीर किस्से त्यांना ऐकवायला सुरवात केली. पण मग नंतर-

“ए कधीपासून आम्हीच काय सांगत बसलोय, तुम्हीपण बोला ना काहीतरी..” म्हणत निलांबरीने क्षितिज अमरलाही संभाषणात ओढून घेतलं. त्यावर अमरने त्यांना अलिकडेच झालेले त्यांचे गॅम्बलिंगचे किस्से ऐकवले. ते ऐकून रिया थक्क झाली. निलांबरीने अविश्वासाने तोंडाचा आ वासला.

जेम्स बॉन्डच्या सिनेमात तिने बर्‍याच वेळा असा कसिनोचा उल्लेख ऐकलेला होता. पण कधी ते जवळून बघितलं नव्हतं. जर त्यात असे पैसे मिळत असतील फॅन्टसीसाठी आपणही एकदा हात आजमावला तर?

निलांबरीने ती शंका म्हणून दाखवली अन रिया आणि अमर जोर-जोरात हसायला लागले. क्षितिजने कपाळावर हात मारुन घेतला!
पण मग त्यांचे एक्सप्रेशन्स बघून तिने स्वत:च ती आयडीया ड्रॉप करुन टाकली. तरीही अमरने तिला एक-दोन डाव आणि त्याच्या ट्रीक्स शिकवण्याचे मान्य केले. रियाने त्याला कोपरापासून हात जोडून घेतले!

थोड्या वेळाने वेट्रेस जेवणाची ऑर्डर घेऊन आली. शॉपिंगच्या निमित्ताने खूप सारी पायपीट करुन आल्याने चौघांनाही जाम भूक लागली होती. जेवण सर्व्ह होताच चौघंही जेवणावर अक्षरश: तुटून पडले. त्यावेळी बाहेर जोरदार पावसाला सुरवात झाली होती…
=========0=========0=========0=========0=========0=========0=====

“रिद्धी? काय गं, किती वाजले? रविवार आहे ना आज- की आजपण तुमचं फिरणं संपत नाही!”

समीधा मावशीचा खणखणीत आवाज कानावर आला आणि रिद्धीला अगदी घरात आल्यासारखं वाटलं!

“मावशी??” अंगावरचं पाणी निपटताना तिनं चमकून किचनच्या दाराकडे बघितलं.
“अगं- गावाला गेली होतीस ना मामाकडे? इतक्या लवकर कशी आलीस?”

“माझं जाऊ दे!!”  भप्पकन पेट घेत ती उद्गरली.

“त्या मामाच्या डोक्याला झाला ताप! म्हणाला, बये- आता जर राहीलीस तर मी तरी वेडा होईन नाहीतर बायलीला तरी वेडं करीन. उपकार कर गं- जा! म्हणून आले!!”

तिच्या तशा अ‍ॅक्शनच्या बोलण्याने रिद्धी खदखदून हसायला लागली.

ही समीधा मावशी म्हणजे अशक्य होती. म्हणायला ती अंजलीची छोटी मावशी होती, पण सगळ्या घराण्यात तिचा वचक होता. बोलायला कोण ऐकेल! तिला दोन भाऊ अन एक बहीण होती; अंजलीची आई- वसुधा.

या सर्वांच्या घरी ती करमत नाही या कारणास्तव महिन्यातून किमान दोन-चार वेळा तरी राहून जायची. पण अशी राहायची की घरच्यांना हातच टेकावे लागावेत! कोणी तिला तीन दिवसांपेक्षा जास्त काळ सहन करु शकत नव्हते. अंजलीच्या घरी मात्र ती चांगली रूळायची. रिद्धी अन अंजलीशी तिची खास गट्टी जमली होती. कधी आलीच तर मावशी कमी- एक मैत्रिण म्हणून ती त्यांना भेटायची. पण म्हणून ती इथे जास्त दिवस राहीली असेल- अह्ं. चौथ्या दिवशी तिचं आपलं जाणं निश्चित!

आत्ताही ती भावाकडे, चांगले पाच दिवस राहून येते म्हणून गेली होती, ती दुसर्‍याच दिवशी इथे धडकली होती!

“हसतेस काय? मी काय विचारतेय ते आधी सांग!”

“अगं, मी- सन्वरीला घरी सोडायला गेले होते, तिथे कॉलेजच्या मैत्रिणी पण आल्या होत्या. मग आम्ही बाहेर कॉफी वगैरे घेतली आणि- सन्वरीच्या घरी जाऊन गप्पा मारत बसलो. तिथेच जरा उशीर झाला”

“ह्म्म छान! म्हणजे जेवली नसणारच तू!”

“हो म्हणजे- जेवणारच होते पण म्हटलं भूक नाही तर कशाला उगीच..”

“जा!! तिथे टेबलावर जेवण ठेवलं आहे बघ, घेऊन खा- की मी देऊ?”

“नाही नको- मी घेते” हसून रिद्धी बाथरुमकडे वळली. हातपाय स्वच्छ धुऊन टेबलाजवळ आली. जेवण वाढून घेत असताना नेमकी अंजलीची आई तिच्याजवळ येऊन उभी राहिली-

“रिद्धी, समीचं मनावर घेऊ नकोस. तशी फटकळच आहे ती थोडी, पण तिच्या मनात काही नसतं”

“अहो- मनावर कशाला घ्यायचं? उलट मावशीचा स्वभाव मला खुप आवडतो. हक्काने बोलते- ओरडते- मायाही तशीच करते. आमच्या अमेरिकेला कुठे असं मिळतं!”

रिद्धी ताट घेऊन खुर्चीत येऊन बसली.

“तुम्ही झोपला नाहीत अजून आई?”

“कुठे? आत्ता जेवणं झाली. हे फोनमध्ये बॅलेन्स टाकायला बाहेर गेले आणि आम्ही किचनमध्ये आवराआवर करायला लागलो”
रिद्धीने हुंकार भरला.

“रिद्धी, सन्वरी बरी आहे ना गं?”

“हो. का—ओ?”

“नाही ती आज दिवसभर तुझ्या रुममध्ये झोपली होती. सकाळी डॉक्टरपण येऊन गेले..”

“अ?… हं-हं, ते होय!” गडबडत रिद्धी सावरत उद्गरली. “ते काही नाही आई, काल जरा पार्टीत तिची जास्तच धावपळ झाली होती. म्हणून खूप दमली होती बिचारी. जरा कणकणी आली होती. बाकी काही नाही”

अंजलीची आई मान डोलावून निघून गेली आणि रिद्धीने सुटकेचा नि:श्वास टाकला.
‘इतक्या लवकर पटलं?’ आश्चर्याने स्वत:शीच मान हलवत रिद्धी खाली बघून जेवायला लागली. इतक्यात बाजूला अंजली येऊन बसल्याचं तिला जाणवलं. ती काही बोलणार इतक्यात रिद्धीनेच तिला हटकलं-

“अंजली- तुला नॉव्हेल शिवाय काही सुचत नाही का गं? किती नॉव्हेल्स वाचणार आहेस?”

“अगं नाही- हे रेफरन्स बुक आहे..”

रिद्धीने शांतपणे एका हाताने पुस्तक उलगडलं. आतमध्ये बाबुराव अर्नाळकरांची कादंबरी होती!

“ते बोल्डमध्ये लिहीलेलं एकोचं कव्हर तू चौथ्यांदा या पुस्तकाला लावलं आहेस! अशाने आई फसेल मी नाही!!”

“अय्या! हो-का!”

अंजलीने जीभ चावली.

“अजून कॉलेजला दोन महिनेही झाले नाहीत, अनं तुझं काय गं हे नॉव्हेल पुराण चालू झालं? काय असतं काय या नॉव्हेल्समध्ये?”

“अगं खूप सॉल्लीड स्टोरी असते. वाचून बघ एकदा. सस्पेन्स नॉव्हेल्समध्ये नायक अस्सा डॅशिंग असतो की, कितीही कॉमप्लीकेटेड सिच्युएशनमध्ये तो यूS बाहेर पडतो, काय भन्नाट कल्पना असतात गं त्याच्याकडे! आणि रोमँटीक लव्ह स्टोरीत तर ते..”

“बाS स..! मला त्या काल्पनिक गोष्टी ऐकायच्या नाहीत. तिथे त्याने पुस्तकात गुदगुल्या केल्या आणि इथे तुम्हाला हसायला आलं!”

अंजलीने ओठ मुडपले.

“मावशी कधी आली?”

“सातला”

“इतकी का रागावलेय?” तिने खांदे उचकले. मग एकदम काहीतरी आठवल्यागत तिनं रिद्धीकडे बघितलं-

“ए रिद्धी, त्यांचं काय झालं गं, ते पोलिसांनी पकडलेले दोघेजण? त्यांचं कोणी साथीदार भेटलं की नाही अजून?”

“ह्म!.. पोलिस इनव्हेस्टीगेशन चाललंय, तसं कोणी सापडलं तर दिग्विजय सर पहिल्यांदा मलाच फोन करु..”

अचानक रिद्धी बोलायची थांबली. थबकून तिने अंजलीकडे नजर टाकली.

“कालचं तू मावशीला तर काही..”

“आय स्वेअर!” पटकन गळा चिमटीत पकडत अंजली उद्गारली. “काही सांगीतलं नाही. सांगीतलं असतं तर, ती शांत बसली असती का? घर डोक्यावर नसतं घेतलं?!!”

रिद्धीचा जीव भांड्यात पडला. ती पुन्हा खाली मान खालून जेवायला लागली.

“खरं तर ती आल्यावर आईचं तिच्याशी उशीरपर्यंत किचनमध्ये बोलत होती. त्यानंतरच ती अशी भडक..”

अंजली बोलायची थांबली. तिचे डोळे विस्फारले गेले. रिद्धीच्या हातातला घास हातातच अडकला. दोघींच्या डोक्यात एकदमच लख्खकन् प्रकाश पडला. चमकून दोघींनी एकमेकींकडे दृष्टीक्षेप टाकला…

समीधा मावशीला केव्हाच सगळं कळलं होतं! फक्त आता कबुली जबाब घ्यायचा तेवढा बाकी होता. तो घेतला की मग…

“अंजू..” ती काही बोलणार तोच तिचा फोन वाजू लागला. अंजलीकडे बघून मान हलवत तिने फोन हातात घेतला. इंस्पेक्टर दिग्विजयचा नंबर बघून ती जरा गंभीर झाली.

“हा, हॅलो सर. बोला..” अंजलीला गप्प राहण्याची खूण करत तिने फोन व्यवस्थित कानाला लावला..
काही वेळ ती तशीच फोनवर ऐकत होती. मग तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पडू लागलं. चेहर्‍यावरचे भाव बदलू लागले. नापसंतीच्या छटा गडद होत चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसू लागल्या. ती आणखीनच सिरिअस दिसायला लागली.

“नो-नो-नो-नो..!!! हे आता चुकीचं होतंय सर. आय विल नॉट अ‍ॅक्सेप्ट धीस अ‍ॅट एनी कॉस्ट!!” शेवटी न राहावून ती उद्गरली.

“तुम्हालाही माहीत आहे सन्वरीसोबत त्याने काय केलं होतं. आणि अशा लफंग्यांना फक्त एका फोन कॉलवर रिलिज करायचं म्हणजे-”

“तुझं म्हणणं बरोबर आहे, रिद्धी. पण सध्यातरी आपल्याकडे त्यांच्या विरुद्ध काहीच पुरावे नाहीत. त्यामुळे कायद्याने आपण काही करता येत नाही”

“पण सर..”

“ऐक.. त्यांच्याविरुद्ध कसलीच तक्रार घेऊन कोणी आलेलं नाही. आणि कोणी येणारही नाही. शक्यतो असल्या केसेसमध्ये मुली पुढे येत नाहीत. सन्वरीचं स्टेटमेंट घेतलं असतं पण, ती स्वत: त्यावेळी नशेत होती. त्यामुळे उद्या त्यांच्या वकीलाला ही केस पलटी करायला एक मिनिटही लागणार नाही. म्हणून म्हणतो- प्रकरण पुढे वाढवण्यापेक्षा इथेच मिटवून टाकू. तेही झाल्या चुकीची माफी मागून सगळं विसरायला तयार आहेत…”

उशीरपर्यंत दिग्विजय बोलत होते. पण रिद्धीला त्यातलं काहीही पटत नव्हतं. जवळपास दहा मिनिटं त्यांचं बोलणं चालू होतं. शेवटी दिग्विजयनी फोन कट केला आणि रिद्धीने हताशपणे सुस्कारा टाकत फोन टेबलावर ठेवला.

बाजूला बसलेली अंजली ‘काय झालं- काय झालं’ म्हणून तिला खोदून-खोदून विचारत होती. पण रिद्धीचा सगळा मुडच ऑफ झाला होता. जेवणावरची इच्छा मरून गेली होती. आज ते मवाली मोकाट सुटले होते. उद्या ते काहीच झालं नाही अशा पद्धतीने वागणार, उजळ माथ्याने सर्वत्र वावरणार..

‘अह्ं, असं व्हायला नको.. कुठेतरी चुकतंय.. आज पोलीसांसमोर त्यांनी माफी मागीतली म्हणजे उद्या ते असं करणारच नाहीत असं कुठे आहे? उद्या त्यांनी पुन्हा एका मुलीला गाठून असं काही कृत्य..

खाडकन रिद्धी भानावर आली!

‘ओह नो!!’

दुसरीच कशाला आपल्यावर डुख धरुन त्यांनी आपल्याच ग्रुपपैकी एखादीला उचलून तिच्यावर काही..

रिद्धी ताडकन् उभी राहिली!

कसाही करुन यांचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. पोलिसांनी त्यांना सोडलं असलं तरी. ती आता त्यांना तशी सोडणार नव्हती. कायदा नाही तर- ती(!) स्वत: त्यांना शिक्षा देणार होती.
हुक ऑर बाय क्रुक्!!

“अंजली, हे सगळं डब्यात भरुन ठेव आणि माझी प्लेट तेवढी धुवून टाक!” गडबडीत अंजलीला म्हणत ती हात न धुता तशीच आपल्या रुमकडे पळत सुटली…
अंजली गोंधळून जाऊन रिद्धी गेलेल्या दिशेनं नुसती बावळटासारखी पाहत राहीली..
=========0=========0=========0=========0=========0=========0=====

अमरने पुढे जाऊन हायर केलेल्या टॅक्सीत बसून रिया अन निलांबरी दोघांचा निरोप घेऊन निघून गेल्या आणि माघारी वळत क्षितिजने आपल्या खिशातून दोन सिगरेटी काढल्या. एक अमरला देत त्याने रस्त्याकडेला लावलेल्या बाईकवर बसत आपली सिगरेट शिलगावली. मग अमरपुढे धरली. अमरने त्याच्या पुढे केलेल्या सिगरेटच्या जळत्या टोकावर टोक चिकटवत आपली सिगरेट शिलगावली. काही वेळ दोघे शांतपणे सिगरेटचे झुरके घेत राहिले. एव्हाना वारं कुठूनही कसंही अंगावर आदळायला लागलं होतं. वर पावसाची चिन्ह दिसायला लागली होती.

“आज पहिल्यांदा काहीतरी केल्याचं मनापासून समाधान वाटतंय” निलांबरीच्या चेहर्‍यावर परतलेलं तेज आठवून क्षितिज म्हणाला.
अमरने नाकातोंडातून धूर सोडत नुसताच हुंकार भरला.

“तिकडची काय खबर?”

“अजून काही नाही. सुलतान बेपत्ता आहे. त्यांचा तिसरा जोडीदारही कुठे दिसला नाही”

“सापडतील- सगळे सापडतील”

“सापडायलाच पाहिजेत, नाहीतर आपल्यासाठी ते चांगलं होणार नाही”

“का?”

“खूप रेड्याच्या कातडीचे लोक असतात हे क्षितिज. असं सहजासहजी कोणाचा पिच्छा सोडत नाहीत”

“मग आपण सोडू काय?”

“तसं नाही रे, पण असल्यांचा भरवसा देता येत नाही. कधी कुठे दगाफटका करतील सांगता येत नाही”

“म्हणजे?”

“आज निलांबरी सुटली. उद्याचं काय? उद्या त्यांनी परत ठरवून तिच्या सोबत काहीतरी वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केला तर?”

“मग आपण कशासाठी आहोत?” तिरप्या नजरेनं अमरकडे बघत क्षितिज मिश्किल स्वरात म्हणाला आणि अमरने मान हलवली.

“एवढंच होतं तर, ऐनवेळी तू त्यांना सोडून का दिलंस?”

“पकडून दिलं!”

“हो, तेच! पण का? तिथेच त्यांना ठेचायचं होतं”

“अह्ं, इथेच चुकतोस तू, अमर! त्यांना मारुन काही होणार नाही. ते अजून तेच करणार! म्हणून त्यांच्या मेन मुळावर घाव बसणं महत्त्वाचं आहे”

“म्हणजे?”

“निलांबरी काय बोलली होती- आठवतंय?—त्यांच्या खूप ओळखी आहेत, आमदार खासदारापर्यंत!
आता आमदार खासदाराचं सोडून दे, ते काय असल्या भानगडीत चोवीस तास नाक खुपसत बसत नाहीत. आणि भिती दाखवायला काय कोणी काहीही म्हणेल. पण त्यांना वाचवणारं कोणीतरी वर बाप बसलेलं असेलच ना!”

“नक्की म्हणायचं काय आहे तुला?… क्षितिज?…”

“देखता जा यार.. सब बातें बोल के थोडी नं की जाती है!” क्षितिजने हसून डोळा मारला.

“हे बघ- उगीच मला गुगलीत टाकू नकोस. तू असा बोलतोयस म्हणजे नक्कीच तुझा डोक्यात काहीतरी शिजतंय. तसं असलं तर पहिल्यांदा मला तो कळू दे. कारण मला घेतल्याशिवाय तू कुठे गेलास ना..”

“अफकोर्स यार! आपण मिळूनच तर हे काम करणार आहोत! बस आता वाट बघ फक्त- ते लोक सुटायची!”

“म्हणजे ते सुटावेत असं तुला वाटतंय?”

“अह्ं- त्यांना सोडायला कोणीतरी ‘सुहृदय’ व्यक्ती कळवळून पोलीस स्टेशनला यावी असं मला मनापासून वाटतंय!” सूचकपणे अमरकडे बघत क्षितिजने सिगरेट विझवली आणि अचानक अमरच्या डोक्यात ट्युब पेटली!

“ओ हो!” क्षितिज बाईक स्टँडवरुन खाली काढत असताना एकदम तो खुष होत उद्गरला,
“म्हणजे आता त्या प्रेमळ व्यक्तीवर प्रेम करायची वेळ आली आहे तर!” हसत त्याने हातातली टीचभर राहीलेली सिगरेट भकाभक ओढत संपवली आणि बाईकवर टांग टाकत त्याने मागच्या सीटवर बसकण मारली. त्याबरोबर क्षितिजने बाईकला वेग दिला.

चौकातल्या गाड्यांच्या गर्दीतून तिरासारखी वाट काढत त्यांची डेव्हील आज्ञाधारकपणे परतीच्या मार्गाला लागली..
=========0=========0=========0=========0=========0=========0=====

रात्रीचे साधारण साडेदहा वाजून गेले असतील.

सस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आली होती. बाजूचे फेरीवाले मात्र तेवढेच हट्टाने आपला पसारा मांडून बसले होते. अंडापाव, नुडल्स, चायनीजवाले अशा पावसाळी रात्रीही ग्राहक येतील या आशेनं- एखाद्या वळणावर किंवा गल्लीच्या तोंडावर- कढई-उलतानचा खडाड्ड-खड् आवाज काढत लोकांचं लक्ष वेधून घेत होते. कुठेतरी मोक्याच्या ठिकाणी उभ्या असलेल्या, वडापाव किंवा पाणीपुरीच्या गाड्याभोवती लोकांची गर्दी उसळलेली दिसत होती.

खरं तर ते ब्लू क्वीनला असतानाच, पावसाची एक मोठी सर येऊन गेली होती. पण तरीही आत्ता आभाळांनी वर नव्याने दाटी करायला सुरवात केली होती. त्यात वार्‍याचा वेगही असा अडेलतट्टू की, एखाद्या पिसाटासारखा सर्वांगावरुन झेपावून जोरात पुढे जात होता. रुमवर जाण्याची तशी घाई नव्हती, पण अशा वादळी पावसाला एकदा सुरवात झाली तर जाणं कठीण होऊन बसेल म्हणून क्षितिजने बाईक थोडी वेगात पळवायला सुरवात केली होती.

ऑपेरा हाऊस पासून हींदमाता पर्यंत ते बिनदिक्कत आले. पुढे हींदमाता टॉकीज जवळ एका टॅक्सीला ओव्हरटेक करत क्षितिजने आपली बाईक उजवीकडून थोS डी पुढे दामटली आणि त्याचवेळी त्याच्या तोंडावर फट्टकन कशाची तरी पट्टी आदळली!

“आईच्ची रे!” कसाबसा ओरडत क्षितिजने बाईकचा तोल संभाळत जोरात ब्रेक दाबला. बाईक साईडला घेतली. तोपर्यंत टॅक्सी ते कसलंस गाठोळं घेऊन लांब निघून गेली होती. क्षितिजच्या तोंडावर आपटलेला पँटचा पाय तेवढा वार्‍यावर ‘बल्ले-बल्ले’ स्टाईलने नाचत क्षितिजला खिजवत पुढे जात होता!

डोळे चोळत क्षितिजने, मोठाल्या बॅगांच्या वर- कपड्यांचं गाठोडं घेऊन जाणार्‍या टॅक्सीकडे, मग एकदा गेस्टहाऊसच्या दिशेने वर नजर टाकली. पण गेस्टहाऊसच्या त्या बाजूला कोणीच दिसत नव्हतं- सगळ्या खिडक्यां रात्रीच्या अंधारात बुडून गेल्या होत्या. कुठेतरी झीरोचा बल्ब टीमटीमत जळत होता.

“कोण होतं रे?”

“काय माहीत! नालायक साले… लाजा सोडल्यात सगळ्यांनी!” क्षितिजने बाईक स्टँडवरुन काढत पुन्हा रागाने गेस्टहाऊसच्या दिशेनं वर नजर टाकली.

“च्यायला, एवढीच जड होत असतील कपडे तर नागडं होऊन फिरा ना!” वर बघत तो जोरात ओरडला. बाईकचा क्लच सोडून त्याने रेस वाढवली आणि-

“ए तुझ्यायची-ए…” लटपटत्या पायांनी चालत्या बाईकवरुनच पाय फरफटवत अन हाताच्या कसरतींनी बाईकचा तोल सांभाळत त्याने पुन्हा एकदा जोरात ब्रेक दाबला. त्यात बाईकचा कंट्रोल गेला. निम्मी अर्धी बाईक फुटपाथच्या डाव्या बाजूने झुकत खाली पडली. एका पायाने लंगडी घालत अमरने तोल सावरला. क्षितिजने दोन्ही हातावर बाईक तोलत वरचेवर पकडली.

“अबे ए- बोकड साल्या! मरायला काय माझीच..” तो खटकन बोलायचा थांबला. त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. अमरही चकीत होत त्याच्याकडे बघायला लागला. त्यांच्या समोर एक तरुण विवस्त्र अवस्थेत उभा होता आणि..

“हायला!!” अमरच्या तोंडून नकळत आश्चर्योद्गार बाहेर पडला. क्षितिज हादरला.

अशा रात्री अपरात्री पोरींच्या नुसत्या स्कर्टवर?….

“ए-ए.. थांब!” तो पुढे सरसावताच क्षितिज बाईकसकट मागे येत शहारत ओरडला.
च्यायला! ही जमात कुठेही फिरायला लागलेय आता!

“न्.. नाही ओ- मी.. मी तसा नाही”

“मग कसा आहेस?”

“मी- म्हणजे- माझे..” पुटपुटत त्याने आजूबाजूला शोधक नजर फिरवली. क्षितिज आणि अमरही तो काय शोधतोय ते उत्सुकतेनं खाली बघायला लागले.

‘काय पावली पडली की काय?’

“कपडे?…”

“अ?”

“माझे कपडे बघितलेत का? हे.. इथेच आत्ता वरून टाकले होते..”

ते ऐकून मात्र क्षितिजची कवटी सरकली. रागाचा पारा चढला. दातओठ खात त्याने खवळून त्याच्यावर शिव्यांचा भडीमार चालू केला. अमरही त्याला बडबडायला लागला. तसा त्याने नमन केल्यासारखा कळवळून हात जोडला..

“काय शिव्या द्यायच्या असतील त्या द्या ओ. आपण नंतर आरामात बसून शिव्या-शिव्या खेळू! पण अगोदर माझे कपडे कुठे आहेत ते सांगा…”

एक हाताने छाती झाकत अन दुसर्‍या हाताने- पुन्हा हवेनं पंचायत होऊ नये म्हणून- मिनी स्कर्ट खाली दाबून ठेवत तो व्हीलनपासून इज्जत वाचवणार्‍या हिंदी चित्रपटातल्या ‘असहाय्य’ तरुणीसारखा रडकुंडीला येत म्हणाला आणि त्याही परिस्थितीत क्षितिज खदखदून हसायला लागला.

“हसू नका रे, मी स्ट्रेट आहे”

“असा?”

“मग?.. माझे कपडे कुठे आहेत?”

“वैकुंठाला गेले”

“म्हणजे?”

“टॅक्सीवाल्याने नेले!”

“का?”

“त्याला आवडले”

“मस्करी नको करु रे”

“कोण करतंय?”

“तू”

“तो मस्करी करत नाही खरं तेच सांगतोय-तुझे कपडे टॅक्सीवर पडले आणि टॅक्सी बरोबर ते निघून गेले!” क्षितिज

“अरे देवा!”

“देवाला नंतर बोलव,आधी तू का असा देशोधडीला लागला आहेस ते पहिलं सांग!”

“सगळं सांगतो, आधी मला इथनं घेऊन चला-” आजूबाजूला लोकांवरुन चोरटी नजर फिरवत तो विनवणीच्या स्वरात म्हणाला, “प्लिज यार… प्लिज..” त्याची अडचण समजून क्षितिजने हसून बाईकवर पुढे सरकत त्याला मागे जागा करुन दिली-

“ये बैस मागे” तो मागे बसायला आला आणि-

“ए थांब-थांब-थांब!” अचानक काहीतरी आठवून क्षितिज ताठरत ओरडला आणि तरुण दचकला-

“आता काय झालं?”

“आत काय घातलं आहेस ना?”

त्याच्या प्रश्नाने तरुणाने हताशपणे अमरकडे नजर वळवली अन मागच्या सिग्नलपासून ते थेट पुढच्या चौकापर्यंत(!) अमरचं हसणं नॉनस्टॉप आदळत राहिलं!…
क्षणात त्यांची बाईक दादर मार्केट पासून वेग घेत किंग सर्कलच्या दिशेनं भन्नाट वेगात पळत राहीली..

ऐन वेळी लोकांनी त्यांच्याकडे बघितलं नसतं, पण ते चित्रच असं होतं की लोकांची नजर आपसूक त्यांच्याकडे जात होती. पावले थबकत होती. डोळे फाडून लोक त्यांच्याकडे बघत होते. आंबट शौकीनांना गुदगुल्या होत होत्या. कोणी बडबडत होतं. कोणी रागवत होतं. कोणी शी:! म्हणून मध्येच नाक आक्रसून घेत होतं.

सिग्नलजवळ तर बाजूच्या- बाईकच्या मागे बसलेल्या एका मुलीने कसंबसं हसू आवरत लाजून त्याच्यापासून नजर फिरवून घेतली होती. पुढे गेल्यावर मात्र आपल्या बॉयफ्रेंडला ती गोष्ट सांगत, ती खदखदून हसायला लागली होती. तिच्या बॉयफ्रेंडनेही मग बाईक चालवताना मान मागे वळवून, एक गाल उडवत यांच्यावर हसून घेतलं होतं. त्यावेळी अमरची चांगलीच तारांबळ उडाली होती.

बरं कोणाला काही बोलताही येत नव्हतं.

सीनच असा होता की कोणाचाही सहज गैरसमज होत होता. त्यात त्या माकडाने फॅशनच्या नावाने इतकी केसं का वाढवून ठेवली होती कुणास ठाऊक! त्याने गोंधळात आणखीन भर पडत होती. त्याची फॉरेनर सारखी दिसणारी गोरी कांती, सपाट पोट अन थेट पोरींच्या वळणार गेलेली स्लिम अंगकाठी याने लोकांना क्षितिज अन अमरच्या मध्ये हमखास एखादी मुलगी बसल्याचा भास होत होता. तीही नुसत्याच एका मिनी स्कर्टवर- फुल टॉपलेस!

धक्का काय ते पहिल्यांदा पब्लिक अनुभवत होतं. बाईक दृष्टीआड होईपर्यंत लोकं या विचित्र त्रिकुटांना बघत होते.

त्यात बाईकवर जागा कमी असल्याने तिघांना घट्ट चिपकून बसण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने ते आणखीन विचित्र दिसत होते. हेल्मेटमुळे तोंड झाकलं गेल्याने क्षितिजला फरक पडत नव्हता. पण मागे अमरची मात्र गोची होत होती. ना खांद्यावर हात ठेवता येत होता, ना त्याच्या उघड्या मांड्यांवर!

काय बोलणार?

“नाव काय तुझं?” मध्येच क्षितिजने बाईकच्या आवाजाच्या वर आवाज काढत मागच्या तरुणाला विचारले.

“नील”

“नील?”

“हो”

“दाढी वाढवून घे लेका, लोकांचा खुप गैरसमज व्हायला लागलाय” लोकांच्या नजरांकडे बघत क्षितिज म्हणाला. एवढ्यात अमरने तोंड वेडवाकडं करत मागून सूर ओढलाच-

“दाढीचं राहू दे. जे आहे ते कापून दे, माणसात तरी येईल!”

त्याच्या बोलण्याने क्षितिज आणखीनच खदखदत हसायला लागला.

“हसतोस काय, यार! याला इन्नर घेऊन देण्यापेक्षा एखादी पँट दिली असती तर बरं झालं असतं! हवं तर त्याचे पैसे मी दिले असते” अमर कुरकुरत म्हणाला,
“तुझं काय रे? तू बसलास आपला हेल्मेट घालून, इथे मागे माझी इज्जत जातेय! लोकांना वाटतंय मीच असल्या नालायक पोरीला मध्ये घेऊन बसलोय!”

त्याच्या तशा बोलण्याने क्षितिजसोबत नीलही खुदकत कसाबसा हसला.

“गप रे!” त्याच्या हसण्याकडे बघून अमर वैतागत म्हणाला पण नंतर दोघांच्या हसण्याने अमरही राग विसरुन स्वत:शीच डोकं हलवत हसत राहिला.

माटुंगा सर्कलच्या थोडं अलिकडे बाईक थांबवून क्षितिजने आपलं जॅकेट नीलला काढून दिलं. सलीमचं गॅरेज यावेळी बंद असल्याने आत जाण्यात अर्थ नव्हता. रात्रीचं अशा अवस्थेत घरी जाण्यापेक्षा क्षितिजने नीलला आपल्या रुमवर यायला सांगीतले. तिथून मग अमर नाहीतर क्षितिजचे- जे कपडे फिटींगला येतील ते घालून सकाळी आपल्या घरी जावावं असं ठरलं. नीलनेही तो प्रस्ताव मान्य केला. नाहीतरी अशा घेरीदार मिनी स्कर्ट घरी जाणं त्याच्या जीवावर आलं होतं.

थंडीने अंगात शिरशिरी आल्याने जवळच्या एका टपरीवर तिघांनी गरमा-गरम चहा घेतला. बिस्कीटं खाल्ली. नीलने तर गुड-डे चे दोन पुडे एकट्याने संपवले. विचारलं तर म्हणाला,

“एच आर साली हरामखोर निघाली. संध्याकाळपासून डिनच्या नावाने उपाशी ठेवलं आणि रात्री लॉजवर नेऊन माझे एकूण एक कपडे काढत खिडकीबाहेर फेकून दिले!”

“का?”

“स्त्री द्वेष्टीपणा रे, दुसरं काय! आमच्या टीममध्ये काम करणारी मधू हीला आवडत नाही. तिनं जवळीक केली की, ही विनाकारण खवळते! काल तर चक्क हीने- म्हणजे मधूने मला जेन्ट्स टॉयलेटजवळ एकांतात गाठून किस केला, गच्च आवळून धरलं आणि नेमकं या एच आर नं आम्हाला बघितलं!”

“हायला! मग?”

“मग काय? आजची दशा बघितलीत ना माझी काय केली ती तिने!- पण नशीब माझे कपडे काढण्याच्या नादात तीही उघडी झाली होती. त्यामुळे मला तिचा हा स्कर्ट तरी पळवता आला. तोच घालून मी कसाबसा हॉटेल बाहेर पडलो तर तोपर्यंत कपडे पण गेले आणि माझं वॉलेट पण गेलं!..”

“अरे पण आता तुझी एच आर काय घालणार? तिचा स्कर्ट तू उचलून घेऊन आलास!”

त्यानं खांदे उडवले.

“घालू दे नं कायपण! काय फरक पडतो? माझा असा नागाबाबा करताना तिनं विचार केला का? मग तिच्या नागीबाबीवर मी का म्हणून..” अशक्यप्राय हसत क्षितिजने त्याला कोपरापासून हात झोडले!

“चल रे बाबा, चल- मी नेतोय ना तुला आता घरी” बाईक स्टँडवरुन काढत क्षितिज म्हणाला. पण नीलचं आपलं एच आर पुराण चालूच..

“अरे दिसते अशी गरीब गाय पण खूप संधीसाधू आहे ती! चान्स मिळाला तर हॉटेल मालकालापण नागडं-उघडं करुन त्याच्या कुल्ल्यावर दोन रट्टे देऊन ‘दे!!!’ म्हणून त्याचे कपडे हिसकावून घेऊन जाईल!” दम खात अमरने कसाबसा बॅक सीटचा आधार घेत बाईकजवळच खाली बसकण मारली.

“अरे बास रे!!..”

क्षितिजने बाईक स्टार्ट केली, तशी त्याला पुढे बोलण्याची संधी न देता अमरने त्याला क्षितिज अन त्याच्या मध्ये कोंबला. क्षितिजने बाईकला वेग दिला. नीलने अशा एच आर लोकांना कसं पिडता येईल यावर क्रूर वगैरे उपाय सुचवायला सुरवात केली..
आसपासचा शांत परिसर तिघांच्या बडबड अन हसण्या, खिदळण्याने ढवळून निघू लागला..

सलीम.. क्षितिज.. अमर..
तीन मित्रांच्या या अभ्येद्य त्रिकुटांमध्ये आज एका नवीन पागल मित्राची भर पडली होती, जो की थेट त्यांच्याच तोडीस तोड होता!
नीलकुमार सोलंकी!

क्षितिज गॅम्बलिंगचा किंग होता..
अमर थापांचा बादशहा होता.. तर नील?…
स्वत:ला इम्रान हाश्मीचा बाप समजत होता!

जोरजोरात हसत क्षितिजने पुढे झुकत बाईकचा फुल्ल स्पीड वाढवला. सायन कुर्ला वेगाने पास करत त्यांची बाईक घाटकोपरच्या दिशेनं जीव खात पळत राहिली..

मागून पावसाच्या टपोर्‍या थेंबांनी कडाडत त्यांना गाठायचा प्रयत्न चालू केला होता…

क्रमश:
=========0=========0=========0=========0=========0=========0=====

मुखपृष्ठ